पुणे, २१ जुलै २०२१: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही जोडी कोणाला माहित नसेल. दोन्ही वेळ पक्षांचे नेते असले तरी एक दिवस का होईना दोघांनी सरकार स्थापन केले होते. योगायोगाने दोन्ही नेत्यांचा वाढदिवस देखील एकाच दिवशी येतो. यावरूनच आता पुण्यामध्ये दोन्ही नेत्यांचे होल्डिंग्स लागलेले दिसत आहेत. होल्डिंग्स लावण्यामध्ये देखील चढाओढ दिसत आहे. जणू पुण्यात होल्डिंग वॉर सुरू आहे. विशेष म्हणजे येत्या सहा महिन्यात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.
येत्या २२ जुलैला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी ने शहरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. येत्या सहा महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असल्याने आपला नेता किती पावरफूल आहे हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीचं वर्ष लक्षात घेता, भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकासपुरुष’ म्हणून होर्डिंग लावले गेले; या होर्डिंग्जला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कारभारी लयभारी’ने उत्तर दिलं आहे. या पोस्टर वॉरची शहरभर चर्चा रंगली आहे.
दोन्ही पक्षांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी होर्डिंग लावल्या आहेत. या होर्डिंगची शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. होर्डिंगवरून भाजपा-राष्ट्रवादी आमने-सामने आल्यानं हा महापालिका निवडणुकीपूर्वीचा ट्रेलर तर नाही ना? अशी चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीतदेखील असाच राजकीय धुरळा उडण्याची चिन्ह यानिमित्ताने दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

