गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर

पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर

पुणे ग्रँड चॅलेंज टूर–२०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या शासकीय व खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलिंग स्पर्धा पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवरून होणार असून, त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात वाहतूक नियंत्रण आणि काही मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, वाहतूक कोंडी टाळणे तसेच स्पर्धेचे नियोजन सुरळीत पार पडावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पर्धा मार्गालगत असलेल्या महापालिका, अनुदानित, खासगी, इंग्रजी व मराठी माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा या सुट्टीत समावेश आहे. संबंधित शाळांनी पालक व विद्यार्थ्यांना याबाबत तात्काळ सूचना द्याव्यात, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस, जिल्हा प्रशासन आणि स्पर्धा आयोजक यांच्यात समन्वय साधून आवश्यक त्या सर्व सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेची तयारी सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे ग्रँड चॅलेंज टूर–२०२६ मुळे पिंपरी-चिंचवड शहराची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होणार असून, क्रीडा, पर्यटन आणि शहराच्या प्रतिमेला चालना मिळणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.

– अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version