पुणे, २३ जानेवारी २०२३ : राऊरकेला येथे झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या टीमने भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ अशा फरकाने पराभव करीत हॉकी विश्वकरंडक स्पर्धेमधून यजमान टीम इंडिया बाहेरचा रस्ता दाखवला. यजमान भारताचे तिकीट कापत न्यूझीलंडच्या संघाने विश्वकरंडकाच्या क्रॉस-ओव्हर सामन्यात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतासाठी हा सामना करो या मरो स्थितीत होता; मात्र टीम इंडियाचा पराभव झाल्याने भारताचा २०२३ च्या विश्वकरंडकातील प्रवास संपुष्टात आला आहे.
निर्धारित वेळेच्या ६० मिनिटे पूर्ण खेळ होईपर्यंत दोन्ही संघांमधील सामना ३-३ असा बरोबरीत होता. संपूर्ण सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले असले तरी न्यूझीलंड संघाने यजमानांना कडवी झुंज देत शेवटच्या क्वार्टर्रमध्ये टीम इंडियावर सरशी केली.
हॉकी टीम इंडिया विश्वकरंडकातूनच बाहेर पडल्याने १९७५ नंतर भारताचे पदक जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे.
गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि क्रिशन पाठक यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये एकूण चार आक्रमणे परतावून लावली; मात्र तरीही भारताला विजय मिळविता आला नाही.
या सामन्यात पहिले दोन गोल करीत भारताने किवी संघावर सरशी केली. न्यूझीलंडने एका गोलने पुनरागमन केले आणि भारताने तिसरा गोल केला. त्यानंतर टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते; मात्र किवी संघाने जबरदस्त पुनरागमन केले. भारताकडून या सामन्यात ललित उपाध्याय, वरुण कुमार आणि सुखजित सिंग यांनी गोल केले.
पेनल्टी शूटआऊटने केला घात
निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी परस्परांशी कडवी झुंज दिली. सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर न्यूझीलंडने ही दमदार खेळी करीत सामना ३-३ असा बरोबरीत आणला; मात्र त्यानंतर पेनल्टी शूटआऊटने भारताचा घात केला. यात न्यूझीलंडने ५-४ असा विजय मिळवीत यजमान टीम इंडियाला विश्वकरंडकातून बाहेरचा रस्ता दाखविला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील