मुंबई, 15 ऑक्टोंबर 2021: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केली असून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या बाबत माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. वर्तनगर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. दंडाधिकाऱ्यांनी 10 हजार रोख आणि एका जामीनाच्या आधारावर जामीन मंजूर केलाय.
अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 365, 324, 143, 148, 506 अन्वये गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात आव्हाड यांच्यावर काल अटकेची कारवाई करण्यात आली.
यापूर्वी घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्या वेळी निवासस्थानी आव्हाड उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करसुमे यांनी केला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे