चंदीगड, १९ सप्टेंबर, २०२२ : एकविसावे जग, आधुनिक जग असे शब्द कानावर पडतात. पण या शब्दांचा खरा अर्थ आपण जपतो का? असा प्रश्न नुकताच चंदीगड विद्यापीठातील घटनेनंतर पडला. चंदीगड विद्यापिठात वसतीगृहातील मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले.
ज्या काळात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत, तेथे अशा घटनांनी स्त्रियांच्या किंबहुना तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पालक खूप विश्वासाने आपल्या मुलींना बाहेरच्या जगात पाठवतात. आपल्या मुलींनी खूप शिकावं, नाव कमवावं अशा संकल्पना विश्वात असताना अशा घटनांनी त्यांचे विश्व कोलमडते, हे सत्य स्वीकारावे लागेल.
चंदीगड प्रकरणात एका मुलीला अटक झाली असून तिने स्वत:चा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला असल्याची कबुली दिली. यावरुन मुलींनादेखील स्वत:चे सौंदर्य किंवा शरीर इतरांना दाखवण्याची गरज भासत आहे, हे यावरुन स्पष्ट होते.
बलात्कार, विनयभंग अशा घटना तर आपल्याला रोज वर्तमानपत्रातून वाचायला मिळतातच, पण इथे एकीच्या चुकीमुळे इतर मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केवळ मुलांना दोष देण्याबरोबर आता मुलींना समुपदेशन करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.
या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर १९ आणि २० सप्टेंबरला विद्यापीठ बंद ठेवण्यात येणार असून पंजाब पोलिस या प्रकरणाचा आढावा घेत आहे. पण या सगळ्यामुळे भारतातील इतर विद्यापिठावर याचे पडसाद नक्की पडणार, हे मात्र खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस