मराठी सिनेमा जगणार कसा, वाढणार कसा? हेमंत ढोमे यांचा सिनेमागृहचालकांना सवाल

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांची गळचेपी होते आहे, अशा शब्दांमध्ये हेमंत ढोमे यांनी चित्रपटगृहांवरील त्यांचा संताप व्यक्त केला आहे. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला ‘सनी’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला; परंतु या सिनेमाचा प्रदर्शनानंतर एक अनोखाच प्रकार बघायला मिळाला. सिनेमागृहातून या चित्रपटाचे शोज् अचानक रद्द केले गेले‌. प्रेक्षकवर्ग असून सुद्धा प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत देण्यात आले. १८१ सिनेमागृहांमध्ये या चित्रपटाचे जवळजवळ ३०० शोज् लावण्यात आले होते. प्रेक्षकवर्ग कमी असल्याने शनिवारी सकाळीच या चित्रपटाचे शोज् रद्द करण्यात आले.

घडलेल्या या घटनेवर चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. हेमंत ढोमे म्हणतात, की मराठी चित्रपटाला हक्काचा वीकेंडही मिळू शकलेला नाही. आता अनेक ठिकाणी शोज् दिसतही नाहीत. दादर, पार्ले, सांगली, सातारा या ठिकाणी शोज् न लागल्याने मला अनेक जणांचे फोन आले आहेत. प्रेक्षकवर्ग जरी कमी असला तरीही प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहण्यासाठी तिकीट बुक करीत आहेत; परंतु एखादा हिंदी सिनेमा जास्त चालत आहे, असे कारण देऊन त्या प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत देण्याचा मेसेज येत आहे. हिंदी सिनेमा जास्त चालतो ही सर्वच चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे; पण महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाला हक्काचे तीन दिवसही मिळत नाहीत. सिनेमा हा हळूहळू वाढत जातो. माझ्या ‘झिम्मा’ या सिनेमाचीही पहिल्या आठवड्यापेक्षा तिसऱ्या आठवड्यात जास्त कमाई झाली होती. या चित्रपटाला देखील थोडा वेळ देणे गरजेचे होते. चित्रपटगृहांनीच जर अशा पद्धतीचे वर्तन केले तर मराठी सिनेमा वाढणार कसा?” असा सवाल हेमंत ढोमे यांनी सिनेमागृहचालकांना केला आहे.

मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी मराठी दिग्दर्शक प्रचंड कष्ट घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ‘सनी’ या चित्रपटाच्या अगोदर प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ हा अतिशय सुंदर, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला चित्रपटदेखील सिनेमागृहांनी आठवडाभरही लावला नाही. आम्ही अतिशय मेहनत घेऊन एक चांगला आणि वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत; परंतु या अशा घटनांनी मराठी चित्रपट दाबला जात आहे का, याचा सर्वांनीच विचार करावा. सरकारने यासाठी कठोर कायदे बनवावेत, प्रत्येक सिनेमाला त्यांच्या हक्काचे शोध मिळावेत, अशी विनंती देखील हेमंत ढोमे यांनी सरकारला केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा