“हृदयस्थ” TV ला घराबाहेर काढू…आणि आयुष्यावर बोलू काही….

71

मित्रहो ….कित्तेक दिवस झाले हा विषय माझ्या डोक्यात आणि मनात कालवाकालव करतोय, मला अस्वस्थ करतोय..पण ..पण… लेखणीत उतरत न्हवता.. सुरुवात कुठून आणि कशी करावी असा प्रश्न होता…

इतिहासात कधीकाळी TV घरी असणं हा श्रीमंतीच आभूषण मानलं जायचं ..त्यावरील बौद्धिक चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम ….आठवड्यातून एखादा… रामायण ,महाभारत सारखी धार्मिक सीरिअल…

संध्याकाळी ७ च्या निष्पक्ष बातम्या.. त्यातील रिपोर्टर बघून वाटायचं ..किती अभ्यासू आणि सुसंस्कृत मधुर वाणीने बातम्या देत आहेत ..अस आपलं संवाद कौशल्य असावं…

दिवसभरातून १ तास TV पाहणं म्हणजे खूपच वेळ मनोरंजन झालं असं वाटायचं ..

कधीकाळी दिवसाची सुरुवात अभंगवाणी आणि हवामान यावर असायची.. नंतर बालभारती कार्यक्रम… नंतर दुपारी आरोग्य जागर …असे कार्यक्रम.. संध्याकाळी बातम्या.. आणि एखादी सीरिअल.. मनोरंजनाचे कार्यक्रम. अशी रूपरेखा होती. आता रूप नाही आणि लक्ष्मण रेखा नाही रामाचं नाही तर लक्ष्मण काय रेखा काय?तर बदललंयच.. कधी या TV ला बंधन होती हा देखील संशोधनाचा विषय..

काळ बदलला माणस बदलली.. विचारसरणी बदलली… पेहराव बदलला… आवड बदलली… खरं सांगू माणसंच बदलली आणि माणूसपण हरवलं…

पूर्वी सवड काढून TV पहायचं ..आता निवड करता येते.. कारण रिमोट हातात आहे…पण मनावर नाही..पूर्वी एक तास TV समोर असणं अपराधी वाटायचं… आता दिवस रात्र TV समोर बसून सगळा नंगानाच पाहूनही डोळ्यांची आणि मनाची भूख भागत नाही ..ए दिल मांगे more ..अशी अवस्था….की हतबलता… की विचाराचा आणि आचाराचा कमकुवतपणा… कशाने आणि कुणी केली ही अवस्था…कुणी गळा घोटला आपल्या सुखी आयुष्याचा… आनंदी आयुष्याचा…..

जन्माला आल्यानंतर ८ ते १० आठवड्याने बाळाची नजर स्थिर होते म्हणतात त्या बाळापासून ८०-९० वर्षी च्या वृद्धा पर्यंत सगळ्यांना आपल्या बोटावर नाचायला लावतोय तो TV.आणि त्याचे बोटावर मोजता येतील एवढे मालक आणि चालक….

८०० ते ९०० संख्येने देशभरात असणाऱ्या या चॅनेल नी त्यातील प्रमुख १०० चॅनेलनी आणि त्यातील काही कर्मचारी आणि मालकांनी ठरवावे… तुम्ही काय खावे? काय परिधान करावे? कुणाला follow करावं? कुणाला unfollow करावं? कोण राष्ट्रभक्त? कोण देशद्रोही?कुणाच्या राजकीय नेतृत्वाचा उदय करायचा आणि कुणाचा अस्त… कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाला पायदळी तुडवायच… इतिहास ही बदलायचा आणि भूगोल ही… देशाच्या प्रगतीचा आलेख वर का खाली यांनीच ठरवायचं ..आकडेमोड खरी कोणती खोटी यांनाच माहीत…त्यांचं आर्थिक गणित करताना… कुठे गुणाकार करायचा …कुठे भागाकार …चॅनेल विकत घेताना बेरीज कशी होते… संपादक बदलताना वजाबाकी कशी करायची ..लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणत म्हणत तिचाच बाजार कसा मांडायचा …आपल्याला पाहिजे ते आणि पाहिजे तस जनतेसमोर मांडायचं… काय चाललंय हे …रोज नवी चर्चा …रोज नवे विषय… ज्याचा तुमच्या माझ्या रोजच्या जीवनाशी काही संबंध नाही… डोकं अक्षरशः बधिर होतंय..
                                                                                 

                                                                                                   क्रमश . . .
                                                                                                              – रवींद्र काटकर