पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये शंभर कोटीचा गौण खनिज घोटाळा

दौंड, १२ जानेवारी २०२३ : संपूर्ण राज्यामध्ये गौण खनिजाबाबत कारवाईचे धोरण अवलंबिले असताना दौंडमध्ये मात्र प्रशासनाकडून याबाबत हरताळ फासल्याची दिसत आहे, दौंड तालुक्यातील वासुंदे, हिगणीगाडा, जिरेगाव, पांढरेवाडी, आदी परिसरात मोठ्या प्रमाणात दगड खाणी व स्टोन क्रशर उद्योग सुरू आहेत. येथील खाणमाफियांनी खोदलेल्या खाणी मुरूमच्या साह्याने १५ ते २० फुटापर्यंत बुजविल्या असून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला आहे.

  • स्थानिकांनी केली ‘ही’ मागणी

दौंड तालुक्यातील वासुंदे परिसरात सुरू असलेल्या नियमबाह्य बेकायदेशीर खान उद्योग व क्रशरवरती जिल्हा खणिकर्म विभाग व महसूल प्रशासनाची मेहरबानी असल्याचे वारंवार दिसून येत आहे. मात्र, याबाबत जिल्हाधिकारी यांनी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

येथील खाण मालकांनी शासकीय ठेकेदारांच्या कामातून घेतला जाणारा गौण खनिज कर दगडखाणींच्या गौण खनिज ‘करा’ संदर्भात असल्याचे दाखवून शासनाचे कोट्यावधी रुपयाची फसवणूक केली आहे. त्यामुळे येथे जवळपास शंभर कोटी रुपयाचा घोटाळा असल्याचा संशय आहे. त्यामुळे येथील सर्व खाण व्यवसायिकांची सॅटॅलाइट मोजणी होणे गरजेचे आहे.

तसेच येथील दगड खाणींची मोजणी करणारे मोजणीदार व जिल्हा खनिकर्म अधिकारी व खाण मालक यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवण्याचा डाव यशस्वी करण्यात खाणमाफियांना यश आले आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी मोजणीदार, खाणमालक यांची चौकशी झाल्यास सत्य समोर येऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल वसूल होऊ शकतो, मात्र यासाठी जिल्हाधिकारी यांनी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र यासाठी आगामी काळात जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : निलेश जांबले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा