नाशिक ,२४ एप्रिल २०२०:
राज्यात सर्वत्र संचारबंदी असल्याने मोल मजुर, श्रमिक आणि होतकरु नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदी काळात हाताला काम नसल्याने अनेक जण आपल्या गावी जाण्यासाठी इच्छुक आहेत.
मुंबईहुन मध्यप्रदेशमधील आपल्या गावी जाण्यासाठी शेकडो नागरिक नाशिक मार्गे पायी जात होते. उड्डाण पुलावरुन नागरिक जात आहेत ही बाब मुंबई नाका पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच या नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग असल्याचे पहायला मिळत आहे.
नाशिक परिसरात शेकडोच्या संख्येने आलेल्या या सर्व नागरिकांना गंगापूर रोडच्या आनंदवली येथे तयार करण्यात आलेल्या शेल्टरमध्ये हलवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास मुंबईहून आलेल्या कंटेनरमधील ४०० नागरिकांना असेच ताब्यात घेण्यात आले होते. ते सुद्धा गावी जात असताना अंबड पोलिसांनी त्यांना शेलटरमध्ये प्रस्थापित केले होते. त्यापैकी एकाला १५ दिवसांनी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता नव्याने ताब्यात घेतलेल्या लोकांचीही तपासणी महापालिका प्रशासनाला करावी लागणार आहे.