इंदापूर, दि.९ मे २०२०: कोरोनासारखे अस्मानी संकट संपूर्ण जगावर ओढवले असून यामधून हातावर पोट असणारा मजूरवर्ग देखील सुटला नाही. केंद्र सरकारने लॉक डाऊन १७ मे पर्यंत वाढविला आहे. तसेच आणखी लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असल्याने आणि मजुरांच्या ठेकेदारांनी तसेच उद्योजकांनी कसल्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. त्यामुळे लोणी देवकर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे शेकडो परप्रांतीय मजूर शुक्रवारी(दि.८) रोजी सायंकाळी अचानक पुण्याच्या दिशेने घरी जाण्यासाठी पायी निघाले.
अचानक निघालेल्या या मजुरांच्या लोंढ्यामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अक्षरशः पायी वारीचे स्वरूप आले होते. गुरुवारीच लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुरू झाली होती. आरोग्य विभागाने आणि लोणी देवकर ग्रामपंचायतीने येथील सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना त्या बाबतचा दाखला दिला होता. त्यामुळे त्यांना घरी जाण्याचा मार्ग देखील सोपा झाला होता.
परंतु शुक्रवारी सायंकाळी अचानक या मजुरांमध्ये कोणीतरी आपणाला घरी जाण्यासाठी उरुळी कांचन येथून रेल्वेची व्यवस्था केली असल्याची अफवा पसरविल्याने शेकडो मजूर अक्षरशः शेकडोंच्या संख्येने पाई पुण्याच्या दिशेने निघाले. कोरोनाच्या भितीमुळे या मजुरांनी येथून काढता पाय घेतल्याचे समजते. परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे डबघाईला आलेली लोणी देवकर औद्योगिक वसाहत आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेच येथील उद्योग आता कामगारांविना कसे सुरु होणार हा देखील मोठा प्रश्न आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे