पुण्यामधील पुरंदर तालुक्यातील नीरा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू

पुरंदर, पुणे २ डिसेंबर २०२३ : नीरा (ता.पुरंदर) येथे नीरा आणि परिसरातील सकल मराठा समाजाच्यावतीने नीरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एक डिसेंबर पासून ते चोवीस डिसेंबर पर्यंत साखळी उपोषण करण्याच मराठा समाजाला आवाहन केलं होतं. या आवाहनानुसार आज शुक्रवार पासून नीरा येथील मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्या पासून नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या वेळी नीरा येथील पोलिसांना याबाबतचं एक निवेदन देण्यात आले. मराठा आंदोलक तुळशीराम जगताप, सचिन मोरे, महेश जेधे, सुरेंद्र जेधे, अंकुश जगता यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी लढत असून त्यांच्या आंदोलनात संपूर्ण मराठा समाज सहभागी आहे.

जरांगे जे आणि जशा पद्धतीने आंदोलन करण्यास सांगतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. जरांगे हे लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत त्यामुळे संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी सुरेंद्र जेधे व सचिन मोरे यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर शांततेच्या व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा