भोकरदन, जालना २६ फेब्रुवारी २०२४ : भोकरदन शहरातील नागरिकांना खडक पूर्णा धरणातील पाणी तत्काळ मिळावे यासाठी २८ फेब्रुवारी रोजी जालना, संभाजीनगर, जिल्हाधिकारी व जीवन प्राधिकरण, सिल्लोड नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्यामुळे, महिला व नागरिकांनी सुरू केलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले.
भोकरदन शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात आले आहेत. असे असले तरी नागरिकांची गैरसोय होत आहे. सातत्याने निर्माण होणारा पाणीप्रश्न पाहता गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. दानवे यांनी नगरपरिषद कार्यालयात तहसीलदार संतोष बनकर व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खडक पूर्णा योजनेची माहिती घेतली. जिल्हाधिकारी श्रीकांत पांचाळ यांना फोन करून तत्काळ बैठक लावण्याच्या सूचना दिल्या. ही योजना सिल्लोड व भोकरदन शहरासाठी संयुक्त असल्याने पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना सुध्दा फोन लावून खडक पूर्णा योजनेतून शहराला तत्काळ पाणीपुरवठा करण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी तहसीलदार संतोष बनकर, मुकेश चिने, शब्बीर कुरेशी, माजी नगराध्यक्ष आशा माळी, अर्चना चिने, श्रावण प्रशाद, सुरेश शर्मा, दीपक बोर्डे, रणवीर देशमुख, शेख नजीर, राहुल ठाकूर, सुमित थारेवाल, श्यामराव दांडगे, श्रावणकुमार आकसे, वंदना हजारे, शोभा मतकर, संध्या शर्मा, संगीता देशपांडे, स्मिता ठाकरे, गंगाधर कांबळे, नारायण तळेकर, ज्ञानेशवर तळेकर, दीपक राठी, हाजी मुजीब यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे