निवार चक्रीवादळाची चेतावणी, तामिळनाडूमध्ये सुट्टीची घोषणा, रेल्वे गाड्या बंद

10

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२०: बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचं क्षेत्र चक्रवात निवारमध्ये बदललं आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी संध्याकाळी पाच वाजता वादळ तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनाऱ्यावर आदळंल. चक्रीवादळाच्या सतर्कतेवेळी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलच्या बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तामिळनाडू, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात दक्षिण रेल्वेनं चक्रीवादळ निवारच्या सतर्कतेमुळं अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी १२ जोड्या म्हणजे २४ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येतील. तर काही गाड्या अर्धवट रद्द करण्यात आल्या आहेत.

पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या गाड्यांच्या तिकिटाची रक्कम अटी व शर्तींच्या आधारे प्रवाशांना परत करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. तसंच अर्धवट रद्द केलेल्या गाड्यांमध्ये तिकिट बुकिंगची रक्कम परत देण्यात येईल.

२५ नोव्हेंबरला वादळ येण्याची शक्यता

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनाऱ्यावर कराईकल ते ममल्लापुरमच्या किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसू शकेल. यावेळी ताशी १००-११० किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या परिणामामुळं तामिळनाडूमध्ये पाऊस सुरूच आहे, तर पुडुचेरीच्या गांधी किनाऱ्यावर जोरदार वारे वाहत आहेत. जोरदार वाऱ्यामुळं समुद्रावरून उंच लाटा उठताना दिसत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे