गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद,अनेक भागांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला

गडचिरोली, २१ जुलै २०२३ : विदर्भात पावसाने चांगलाच कहर केला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने चंद्रपूरसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. भंडारा जिल्ह्यात कालपासून काही ठिकाणी मध्यम तर रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग नंदिगावपासून पूर्णपणे बंद झाला. नंदिगाव येथून राष्ट्रीय महामार्गावर तीन ते चार फूट पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली आणि आसरअली या भागात १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. असाच पाऊस सुरू राहिला तर जिल्हा मुख्यालयातील अनेक भागांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.गडचिरोली मध्ये पावसामुळे सिडकोंडा -झिंगानूर, कोत्तापल्ली र. – पोचमपल्ली, आसरली – मुतापुर- सोमणूर, मौशीखांब – अमीर्झा,साखरा – चूरचूरा, कुंभी – चांदाळा,रानमूल – माडेमूल, आलापल्ली- सिरोंचा रा.म.मा,कान्होली -बोरी-गणपूर, चामोर्शी- कळमगाव, चांभार्डा- अमिर्झा हे मार्ग बंद झाले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत केवळ १८% पावसाची नोंद झाली होती. मात्र ती आजच्या दिवसापर्यंत सरासरीच्या ३८% एवढी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा , इरई, वर्धा या नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील निम्न वर्धा धरणाची दारे उघडली जाणार आहेत. त्याची आवक वर्धा नदीत होऊ लागल्यावर वर्धा नदीची पाणी पातळी वाढणार आहे. परिणामी या नदीला जोडणाऱ्या सर्व उपनद्या देखील भरून वाहणार आहेत. त्यामुळेच प्रशासनाने वेळीच पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा