मंगळवेढा, सोलापूर १४ ऑक्टोबर २०२३ : एका मेंढी व्यापाऱ्यास शेत जमिनीच्या वादातून, पहिल्या पत्नीकडून झालेल्या मारहाणीनंतर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पहिल्या पत्नीसह चौघांवर विजयपूर पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना मंगळवेढा तालुक्यातील निंबोणीत घडली होती. त्यामुळे गुन्हा विजयपूर पोलिसांकडून मंगळवेढा पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे. श्रीमंत बिरादार (वय ६३) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी पार्वती बिरादार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पहिली पत्नी महादेवी बिरादार, रावसाहेब पाटील (रा.निंबोणी ता.मंगळवेढा), प्रकाश बिरादार, शिवराज बिरादार (रा.जेऊर ता.इंडी जि. विजयपूर) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी पार्वती बिरादार या श्रीमंत बिराजदार यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. मृत श्रीमंत यांच्या नावावर ४ एकर २० गुंठे जमीन आहे. उर्वरीत ३ एकर ६ गुंठे जमीन ही महादेवी हिस देण्याचा करार झाला होता. १ सप्टेंबर रोजी फिर्यादीचा नवरा श्रीमंत हे निंबोणीला आले होते. त्याठिकाणी जमीन नावावर का करुन देत नाही? म्हणून मृत श्रीमंत यांना पहिली पत्नी महादेवीसह चौघांनी मारहाण केली. त्यानंतर श्रीमंत यांना उपचारासाठी विजापूर येथील दवाखान्यात दाखल केले, उपचारादरम्यान ६ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वरील आरोपीं विरोधात भा.द.वि. सं कलम ३०२, ३४ प्रमाणे मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने हे करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : दगडू कांबळे