मी राजीनामा देण्यास तयार, समोर येऊन बोला… हवं तर शिवसेना प्रमुख पद देखील सोडेल: उद्धव ठाकरे

मुंबई , 22 जून 2022: राज्यात विधानपरिषद निवडणूक झाल्यापासून राजकारण तापलेलं दिसत आहे. शिवसेनेचे अनेक आमदार फुटले अशा चर्चा चालू होत्या. आणि ते काल समोर आलं देखील. एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदार माझ्या सोबत असल्याचा दावा केला आहे. या बरोबरच त्यांनी अशी मागणी देखील केली होती की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडावं किंवा भाजप सोबत युती करावी. त्यांनी असाही उल्लेख केला होता की मुख्यमंत्री फडणवीस असतील तर उपमुख्यमंत्री ते स्वतः असतील.

सध्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत असलेले सर्व आमदार गुवाहाटी येथे एका हॉटेलमध्ये ठेवले आहेत. आज दिवसभर चाललेल्या या राजकीय नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून समोर आले. यावेळी त्यांनी बंडखोरांना समोर येऊन राजीनामा मागावा असं सांगितलं. मी मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार आहे पण बंडखोरांनी समोर येऊन मला तसं सांगावं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले की, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी माझ्या सोबत संपर्क साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगितलं. स्वतः मला त्यांनी माझ्याशी संपर्क करून सोबत असल्याचं सांगितलं. पण, जर माझीच लोकं माझ्या सोबत नसतील तर काय? मी मुख्यमंत्रीपदी नकोय हे सांगण्यासाठी इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता काय? हे तुम्ही इथं देखील सांगू शकला असता.”

मी राजीनामा देण्यास तयार

पुढं ते म्हणाले की, “जर मी सत्ता चालवण्यास लायक नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन मला तसं सांगावं. मी आत्ता राजीनामा देण्यास तयार आहे. हे फेसबुक लाईफ संपल्यावर मी आता माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओडून ताडून खुर्चीला चिटकून बसणार नाही. मी बाळासाहेबांचा पुत्र आहे. कोणताही मोह मला खेचू शकत नाही. पण, तुम्ही हे समोर येऊन बोला. तुम्ही का बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, हिंदुत्व राहिलं नाही या गोष्टी बोलत आहात.”

“मी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यास देखील तयार”…

ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात आणलं तिचाच वापर करून शिवसेनेवर घाव घालण्याचा प्रयत्न करू नका. मी राजीनामा लिहून ठेवत आहे. या समोर बसा आणि राजीनामा घ्या. जे आमदार निघून गेले आहेत त्यांनी यावं राजीनामा घ्यावा आणि राज भवनात जावं. हे मी मजबुरित करत नाही. काय होईल जास्तीत जास्त… पुन्हा लढू, संघर्ष करू. जोपर्यंत बाळासाहेबांनी जोडून दिलेले शिवसैनिक माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मी कोणत्याही संकटांना किंवा आव्हानांना भीत नाही. मी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यास देखील तयार आहे. पण हे सांगणारा कोणी फडतूस विरोधक नको. शिवसैनिकांनी मला असं सांगावं मी तेही करण्यास तयार आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा