सई मांजरेकरची टीकांवर प्रतिक्रिया
मुंबई, १ डिसेंबर २०२२ : चित्रपटसृष्टीत घराणेशाहीबद्दल नेहमीच चर्चा होत असते. अशातच दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या मुलीलाही घराणेशाहीवरून टीकांचा सामना करावा लागतोय. महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने सलमान खानच्या ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने तेलुगू चित्रपटसृष्टीतील ‘मेजर’ या चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. तिच्या अभिनयाच्या जोरावर ती इंडस्ट्रीत तिची स्वतःची ओळख निर्माण करू इच्छिते; परंतु स्वतःची ओळख निर्माण करतानाच तिला अनेक टीकांना सामोरे जावे लागते आहे. आणि यावरूनच तिने एका मुलाखतीत तिची प्रतिक्रिया दिली आहे.
याच मुलाखतीत बोलताना सई म्हणाली, “तुला घराणेशाहीचा फायदा मिळतो, असं जर कोणी मला म्हणत असेल तर प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास मी ते मान्य करीन. घराणेशाहीमुळे जो विशेष अधिकार मिळतो त्याला मी नाकारणार नाही. मी ते मान्य करते आणि त्याचा स्वीकारही करते; पण तरीसुद्धा मी त्यातून काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आहे. इतरांपेक्षा थोड्या सहजतेने मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. मी आज जिथे पोचले आहे तिथे पोचण्यासाठी एखादी व्यक्ती दहा पटींनी जास्त मेहनत करीत असेल; पण मलाही मला मिळालेली जागा टिकून ठेवण्यासाठी दहा पटींनी जास्त मेहनत करावी लागेल.”
बॉलिवूड इंडस्ट्रीत कलाकारांविषयी काही ठराविक धारणा असल्याचे तिने सांगितले. तिच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी काही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये तिने सहभाग घेतला होता. त्यावेळी तिने डाएटिंग केले असेल असे गृहीत धरून तू खाणार आहेस की डाएटिंग करतेस, असा प्रश्न अनेक जणांनी तिला विचारला. अभिनेत्री नेहमीच डाएट करतात असा तिथे समज आहे, असे ती म्हणाली. माझ्या कामामुळे अनेक लोकांना ज्यांना मी आधीपासून ओळखते त्यांना मी अहंकारी वाटू शकते. माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी बदलल्या आहेत असा गैरसमजही त्या लोकांचा होऊ शकतो; परंतु हा गैरसमज लोकांच्या डोक्यातून काढणं कठीण असल्याची खंतही तिने बोलून दाखवली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे