मुंबई, ९ सप्टेंबर २०२०ः सध्या कंगना राणावत आणि सेना यांच्यात चांगलाच वाद रंगलेला दिसत आहे. मुंबईत मोठे वादंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कंगना राणावत हिने शिवसेनेला आव्हान केले होते. आज कंगना मुंबईत दाखल झाली असून विमानतळावर शिवसेनेचे आक्रमक कार्यकर्ते कंगनाचा निषेध करताना दिसून आले. तसेच रिपब्लिकन पक्षाचे आणि करणी सेनेचे कार्यकर्ते कंगनाच्या संरक्षणासाठी दिसून आले. कंगणाने मुंबईत पोहोचण्या अगोदर ट्विटची मालिका चालू करत राज्य सरकारवर निशाणा साधत पुन्हा एकदा मुंबईला पाकिस्तान असं म्हटलं होतं. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंगणाच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, “मला वाटतं की अशी वक्तव्य करणाऱ्यांवर आपण जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे, याचा जनतेवर काय परिणाम होईल हे आपण पाहायला हवं. माझ्या मते याचं कोणी इतकं गांभीर्य घेत नाही.”
शरद पवार यांनी मुंबई महापालिकेचे कान टोचत म्हणाले, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांची तुलना कोणी पाकिस्तानशी केली तर त्याकडे जास्त लक्ष देऊ नका आणि गांभीर्याने घेऊ नका.
दरम्यान, कंगणाचं बांधकाम हे अधिकृत आहे की नाही हे मला माहित नाही. मुंबई महापालिका ही कायद्यानुसार काम करते मात्र मुंबई महापालिकेने अशा परिस्थितीत कारवाई केल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण झाली असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे