मी कोणत्याही काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नाही, या चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जातायत, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

मुंबई, ७ जुलै २०२३: मागच्या रविवारी राज्यात राजकीय भूकंप होऊन, नवीन राजकीय समीकरणे उदयास आलेली दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याची सुध्दा चर्चा सुरु आहे. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.मी कोणत्याही काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नाही. या चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत,असे पंकजा मुंडें पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

मला मागच्या काही दिवसांपासून सतत फोन येत आहेत. मी २०१९ मध्ये भाजपची उमेदवार होते आणि माझा पराभव झाला.मी मागच्या चार वर्षापासून नाराज आहे. त्याचबरोबर मी पक्ष सोडून जाणार आहे अशा चर्चा सुरु आहेत. काँग्रेसचे नेते सुध्दा म्हणत आहेत की, पंकजा मुंडे आल्या तर स्वागत आहे. हे सगळे कोण पसरवत आहे ?,या सगळ्या अफवा आहेत असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले.

माझ करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा आहे. मी गेली २० वर्ष राजकारणात काम करीत आहे. मी सरळ मार्गाने आणि स्पष्ट बोलून काम करते. त्याचबरोबर माझ्याबाबत मुद्दाम चर्चा घडवून आणल्या जात आहेत. पंकजा मुंडे पात्र की अपात्र हे पक्ष ठरवेल मी कसे सांगू असेही त्या म्हणाल्या.माझ्यावर अनेक आरोप झाले आहेत, मला पराभव पत्करावा लागला आहे. मी ईश्वर साक्ष आज शपथ घेते की, मी कोणत्याही नेत्याला, कोणत्याही पक्षाला माझ्या पक्ष प्रवेशासाठी कधीही भेटलेले नाही. मी माझ्या आयुष्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले सुध्दा नाही. असेही मुंडे यांनी सांगितले.

मी याच्याआगोदर सुध्दा म्हणाले होते की, राजकारणात जर चुकीची गोष्ट करावी लागली, तर मी राजकारण सोडेन. मी दोन महिन्यांची सुट्टी घेत आहे. मला अंतर्मुख व्हायची गरज असल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा