मढी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी या मुख्य शहरापासून अगदी १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेले गाव म्हणजे मढी. या गावात एक पुरातन देवस्थान असून येथील हे मंदिर एक ऐतिहासिक वास्तु आहे. या ठिकाणी नाथपंथी संत कानिफनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे. या ठिकाणी दर्शनासाठी देशभरातून भक्तगण येत असतात.
हे मंदिर १७ व्या शतकातले असावे. अशी अभ्यासकांची माहिती आहे. मढी गावाच्या दक्षिणेला साडेपाच किलोमीटर अंतरावर मच्छिंद्रनाथांचे मंदिर व त्यांची संजीवन समाधी आहे. तसेच येथून काही अंतरावर भगवान गड व मोहटा देवी हे देवस्थान देखील आहे.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर हे वारकऱ्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र कानिफनाथांचे मढी हे गाव ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. मढीमध्ये होळी ते गुढीपाडवा असा पंधरा दिवस महायात्रोत्सव साजरा केला जातो.
पूर्वीच्या काळी वडार, वंजारी ही लोक व्यवसायानिमित्त भटकंती करत असत. त्यामुळे वर्षभरात देव दर्शन आणि एकमेकांच्या भेटी-गाठी घेण्यासाठी मढी या ठिकाणी यात्रोत्सवाच्या काळात येत असत. त्यामुळे यास भटक्यांची पंढरी असे म्हटले जाते.
यात्रेच्या काळात मिठाई, फुलभांडारांची दुकाने सजलेली असतात. येथील मिठाईचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या आकाराच्या रेवड्या. मढीच्या यात्रेतील रेवड्यांचा आकार मोठा असतो आणि त्याची चवही विशेष असते. या रेवड्या प्रत्येक भाविकाच्या आवडीच्या असतात.
पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे गाढवाचा बाजार भरतो. विविध जातीचे गाढवं याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात.यादरम्यान लाखोंचा लिलाव या ठिकाणी केला जातो. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात यासह अन्य राज्यातील भाविक याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
या देवस्थानाबाबत अशी आख्यायिका बोलली जाते की, ९ नारायणांनी वेगवेगळ्या नाथांच्या रुपामध्ये भूतलावर अवतार घेतला. यापैकी एक श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयात एका हत्तीच्या कानामधून जन्म घेतला म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले.
कानिफनाथांनी प्रर्दीर्घ काळ नाथसंप्रदायाचे काम केले. धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले. नाथ पंथाचे कार्य करत ते हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी मढी या गावी फाल्गुन वद्य (रंगपंचमी)च्या दिवशी संजीवनी समाधी घेतली. तेव्हापासून हे ठिकाण कानिफनाथ या नावाने ओळखले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातुन भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.