तक्रारी आल्यास मंडळांवर गुन्हे दाखल करणार

पुणे, ९ सप्टेंबर २०२२ : विसर्जन मिरवणुकीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात निघणार आहे. डीजेचा दणदणाट अन् ढोल-ताशांचा कडकडाट पुणेकरांना पाहिला मिळणार आहे. दरम्यान, मिरवणुकीत कोणाकडून ध्वनीप्रदूषण किंवा अन्य तक्रारी आल्या, तर मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यामुळे सकाळपासून बंदोबस्ताला सुरुवात होणार आहे. आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी केली आहे.

विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर व उपनगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत. विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने, मोबाईल हिसकावणे तसेच महिलांची छेडछाड या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत.

बेवारस वस्तू दिसल्यास…..

शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्षात किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

तीन हजार मंडळांच्या मूर्तीचे होणार विसर्जन गणेश प्रतिष्ठापनेनंतर शहरात पहिल्या सात दिवसांत ३३३ सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन केले आहे. तर २ लाख ४ हजार ६५३ घरघुती गणपतींचे विसर्जन झाले आहे. शुक्रवारी (दि. ९ ) २ हजार ९६९ मंडळांच्या आणि घरगुती २ लाख २२ हजार ९७७ गणपतींचे विसर्जन होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा