गोल पोस्ट गोल पोस्ट कंगना ‘झाशीची राणी’ असेल तर अजय ‘भगतसिंग’ आणि विवेक ‘मोदीजी’ असायला हवेत

कंगना ‘झाशीची राणी’ असेल तर अजय ‘भगतसिंग’ आणि विवेक ‘मोदीजी’ असायला हवेत

मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२०: बॉलिवुड अभिनेत्री कंगना रनौत एक चित्रपट करून स्वतःला ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ समजत असेल तर अजय देवगण हे ‘भगतसिंह’ आणि विवेक ओबेरॉय हे ‘मोदीजी’ असायला हवेत असा टोला दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी कंगनाला लगावला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलिवूड मधील नेपोटीझम, ड्रग्स अँगल आणि आता थेट महाराष्ट्र सरकारशी पंगा घेत अचानक चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रनौतला अभिनेते प्रकाश राज यांनी चांगलाच चिमटा काढलाय.
“मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटते”, “मुंबई पोलीस बॉलिवुड माफियापेक्षा खतरनाक आहेत” अशी अनेक वक्तव्यं करून कंगनाने महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर बीएमसीने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा चालवला आणि हा वाद आणखी चिघळला. तेव्हा कंगनाने बीएमसीची तुलना चक्क ‘बाबर’ सोबत केली आणि स्वतःच्या घराची तुलना राम मंदिराशी तर स्वतःची तुलना थेट “झाशीची राणी लक्ष्मीबाई” यांच्यासोबतच केली. त्यामुळे कांगनावर चौफेर टीका होत आहे.

अशातच दक्षिणेचे अष्टपैलू अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरवर एक मीम शेयर केलंय. ज्यात लिहिलंय की, एका चित्रपटात “राणी लक्ष्मीबाईंचं” पात्र साकारून कंगना स्वतःला झाशीची राणी समजत असेल तर मग भगतसिंग यांची भूमिका साकारणारा नट अजय देवगणही “भगतसिंग” असेल, दीपिका “राणी पद्मावती” असेल, आणि पंतप्रधानांची भूमिका साकारणारा विवेक ओबेरॉय हा थेट “मोदीजी” असेल… असा मीम प्रकाश राज यांनी ट्विटरवर शेयर करत “जस्ट आस्किंग” हा हॅशटॅग वापरला आहे.

प्रकाश राज यांच्या या ट्वीटला ५० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून हजारो लोकांनी रिट्विट आणि कमेंट्स केल्या आहेत. एकूणच कांगनाच्या या अंधाधुंद वक्तव्यांचा प्रकाश राज यांनी आपल्याच स्टाईलमध्ये चांगलाच समाचार घेतलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

error: Content is protected !!
Exit mobile version