मुंबई, दि. १० जुलै २०२०: मुंबई आणि पुण्यामध्ये काम करत असलेल्या चाकरमान्यांसाठी कोकणा मध्ये जाण्यासाठी बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आज चर्चेत आहे. ७ ऑगस्ट नंतर मुंबई आणि पुण्यातील व तसेच इतर भागातील चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग किंवा कोकणामध्ये जाण्यासाठी निर्बंध असणार आहे. यावर प्रतिक्रिया देत नारायण राणे म्हणाले आहेत की, गणेशोत्सवादरम्यान चाकरमान्यांना कोकणामध्ये प्रवेशास बंदी घातल्यास आम्ही आंदोलन करू.
यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी टोला लगावत असे म्हटले की, “एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’. मुंबई पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी आपले मत व्यक्त केले होते. कोकणात चाकरमान्यांना जाण्यास बंदी घालण्याबाबत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देखील विरोध केला होता त्यांच्या लगोलग नारायण राणे यांनी देखील या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
“कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेले चालणार नाही. त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करु नये. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल.” असं नारायण राणे म्हणाले.
सध्या महाआघाडी मध्ये एकमेकांवर टीका करणे सुरू आहे याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, “शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनेचे मंत्री आणि नेते यांचेच ऐकले जात नाही. महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. शिवसैनिकानाच कोणी विचारत नाहीत, अशी स्थिती आहे.”
या आधी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देखील याबाबत आपले मत व्यक्त केले होते. गणपती बाप्पा आणि चाकरमान्यांची भेट घडवून आणण्यासाठी तसेच कोकणात चाकरमान्यांना जाण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत याविषयी बोलताना आशिष शेलार यांनी ट्विट केले होते की, “लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका. कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य आहे का?” असे प्रश्न देखील अशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी