मुंबई, १६ ऑक्टोबर, २०२२ : अंधेरी पोटनिवडणूक आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. त्यातही राज ठाकरे यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्राने भाजपची कोंडी केली आहे. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके बिनविरोध निवडून येण्यासाठी भाजपनेही ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांची शैली बाळासाहेबांशी मिळतीजुळती असल्याने मराठी मतदारांमध्ये राज यांच्याविषयी आपुलकी आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने घेतलेली ‘न्युट्रल’ भूमिका निर्णायक ठरु शकते. राज ठाकरे यांनी मनसेच्या मतदारांना मुरजी पटेल यांच्यापाठी उभे राहण्याचे आव्हान केले असते तर थोडी का होईना, पण मनसेची मतं भाजपला मिळाली असती. परंतु, राज ठाकरे यांनी या पोटनिवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे अंधेरी पूर्वमधील मराठी मतदार ठाकरे गटाकडे वळू शकतो. राज
ठाकरे यांच्या आव्हानानंतर एखाद्याला ठाकरे गटाला मतदान करायचे नसले तरी सहानुभूतीच्या फॅक्टरमुळे ही मतं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे वळू शकतात.
या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्वची लढाई निकराची होणार, अशी चिन्हं दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाकडून आक्रमकपणे वातावरण निर्मितीही केली जात होती. परंतु, राज ठाकरे यांच्या एका ट्विटमुळे ही सगळी मेहनत पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी ऋतुजा लटके बिनविरोध निवडून याव्यात, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्याविषयी सामान्य मतदारांमध्ये असणारी सहानुभूती आणखी वाढेल. अशा वातावरणात भाजप आणि शिंदे गटाने कितीही आक्रमक प्रचार केला तरी पोटनिवडणुकीत त्यांची डाळ शिजण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गट अंधेरी पोटनिवडणुकीच्या लढाईतून माघार घेतात का, किंवा ही लढाई लढणार का? हे पाहणे गरजेचे आहे. त्यावर पुढील समीकरणं ठरणार हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस