नाशिक, २ ऑगस्ट २०२३ : राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत.मग आमच्या गावालाही दोन उपसरपंच देता येतील का? गावाचा विकास करण्यास अधिक मदत होईल. अशा अनोख्या मागणीसाठी नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गावच्या सरपंचांनी तहसील कार्यालयाला पत्र देऊन मार्गदर्शन मागवले आहे. तसेच आमच्या ग्रामपंचायतीसह राज्यातील इतर ग्रामपंचायतींना देखील दोन उपसरपंच नियुक्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी या गावची लोकसंख्या ही ६६२३ एवढी आहे. चंदनपुरी ग्रामपालिकेत ९ सदस्य संख्या असून २२ कर्मचारी या गावात कार्यरत आहेत. ग्रामपालिकेचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३५ लाख आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असल्याने गावाला दोन उपसरपंच मिळाल्यास गावाचा जास्तीचा विकास साधता येईल, अशी अपेक्षा बाळगून गावाला दोन उपसरपंच मिळावेत म्हणून तहसील कार्यालयाकडे सरपंच विनोद शेलार यांनी मार्गदर्शन मागवले आहे.
दरम्यान गावाला दोन उपसरपंच मिळाल्यास सामजातील विविध घटकांना पदाच्या माध्यमातून आणि गावाच्या विकासातून योगदान देता येईल. चंदनपुरी गावातील सरपंचाने दोन उपसरपंच नेमण्याबाबत मार्गदर्शन मागितले आहे. मात्र ग्रामपंचायत अधिनियमाची तपासणी केली असून याबाबत दोन उपसरपंच नेमण्याबाबत कायद्यात कुठलीही तरतूद नसल्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी स्पष्ट केले.
राज्यात ज्याप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक गावात दोन उपसरपंच पदाची पद्धत लागू करण्याची मागणी चर्चेचा विषय ठरत आहे. मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गावच्या सरपंचाने अशी मागणी केली आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री मग दोन उपसरपंच देखील नेमण्यात यावेत. ही मागणी मान्य होवो अथवा ना होवो मात्र चंदनपुरी सरपंचांनी काढलेले निवेदन सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल झाल्याने या पत्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर