नवी दिल्ली, ३१ मे २०२३ : कुस्तीपटूंनी आपले मेडल गंगा नदीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आता भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर हे कुस्तीपटू स्वत:चे मेडल गंगानदीत सोडू इच्छित असतील तर मी त्याला काय करू शकतो, असे सांगत बृजभूषण सिंह म्हणाले आपण अटकेसाठी तयार आहोत.
आंदोलक कुस्तीपटू त्यांची मेडल्स् गंगा नदीत सोडायला गेले होते. परंतु त्यांनी मेडल्स् गंगा नदीत सोडले नाहीत. तर त्या ऐवजी त्यांनी ही मेडल्स् नरेश टिकैत यांच्याकडे दिली. तो त्यांचा अधिकार आणि त्यांची भूमिका आहे. याला मी काय करू शकतो. असे सांगत बृजभूषण सिंह म्हणाले, माझ्या हातात काहीच नाही. माझ्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांना तपासात मी दोषी आढळलो. तर मला अटक केली जाईल. त्यासाठी मी तयार आहे. मला यात कोणतीच अडचण वाटत नाही, असेही बृजभूषण सिंह म्हणाले.
बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे याकडे लक्ष वेधले असता, त्यावरही बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. माझा कार्यकाळ आता संपला आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. लवकरच निवडणूक जाहीर होईल. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही,असेही बृजभूषण सिंह यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर