अटीतटीच्या सामन्यात पंजाबने राजस्थानचा पाच धावांनी केला पराभव, नॅथन अॅलिनने घेतल्या चार विकेट

गुवाहाटी, ६ एप्रिल २०२३: आयपीएल २०२३ चा आठवा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला, या सामन्यात पंजाबने राजस्थानचा पराभव केला आहे. चित्तथरारक सामन्यात पंजाब किंग्जने बुधवारी राजस्थान रॉयल्सचा पाच धावांनी पराभव करून इंडियन प्रीमियर लीगमध्ये दुसरा विजय नोंदवला. धवन (५६ चेंडूत ८६ धावा) आणि प्रभसिमरन (३४ चेंडूत ६० धावा) यांच्यातील पहिल्या विकेटसाठी ९० धावांच्या भागीदारीच्या जोरावर पंजाबने चार बाद १९७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रॉयल्स मैदानात उतरले मात्र सुरवातीलाच विकेट बहाल केल्या. संजू सॅमसन, हेटमायर, जुरेल यांची झुंज अपयशी ठरली.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर कालचा प्रथमच आयपीएल सामना झाला. लोकल बॉय’ रियान परागन आल्या आल्या दोन षटकार खेचून प्रेक्षकांमध्ये जोश भरला, परंतु १२ चेंडूंत २० धावा करणाऱ्या रियानला पीबीकेएसच्या एलिसने बाद केला. कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल यांनी संयमी खेळ करताना आरआर ची पडझड थांबवली होती. पण, एलिसने ही जोडी तोडली आणि २५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ४५ धावा करणारा संजू झेलबाद झाला. यशस्वीने पहिलाच चेंडू खणखणीत षटकार खेचला. पण, अर्शदीप सिंगने राजस्थानला धक्के दिले. यशस्वी ( ११) आणि अश्विन ( ०) यांना त्याने माघारी पाठवले.

दरम्यान, पंजाबचा आयपीएलमधील राजस्थानवरील हा ११ वा विजय ठरला आहे. पंजाबने दिलेले १९८ धावांचे आव्हान पार करताना राजस्थानचा संघ २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १९२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयानंतर पंजाब किंग्स संघाकडे ४ गुण झाले आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला होता. तर राजस्थानच्या हेटमायरने शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीने सामन्यातील रंगत वाढली. मात्र तो शेवटच्या षटकात धावबाद झाला आणि राजस्थानच्या बाजूने झुकणारा सामना पुन्हा पंजाबच्या बाजूने झुकला. अशा प्रकारे राजस्थान संघाला या सामन्यात ५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा