मुंबई, दि. २० जुलै २०२०: देशावर कोविड -१९ संकट असताना केंद्र सरकारने राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावरून सध्या राजकीय पटलावर एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम जोरात चालू आहे. काल शरद पवार यांनी देखील नरेंद्र मोदींवर टीका केली होती व म्हटले होते की, सध्या कोविड -१९ स्थिती गंभीर होत आहे त्यामुळे सरकारने या गोष्टीकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे, तर सरकार आता राम मंदिराच्या भूमिपूजन वर लक्ष केंद्रित करत आहे.
शरद पवार यांच्या या टीकेला भाजप नेत्यांकडून देखील प्रत्युत्तर आले होते. नारायण राणे, उमा भारती यांसारख्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर देखील त्यांच्या वक्तव्यावरून टीका करण्यास सुरुवात केली होती. भाजपने केलेल्या या टीकेनंतर आता काँग्रेस देखील मागे राहिलेली नाही काँग्रेसने देखील भाजप वर टीका करत असे म्हटले आहे की, कोविड -१९ बाबत परिस्थिती हाताळण्यामध्ये केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपले हे अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारने आता राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम आयोजित करून केंद्र सरकार आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून केंद्र सरकार जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या वतीने ही टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
एकीकडे आघाडी सरकार राम मंदिराच्या भूमीपूजन वरून केंद्र सरकारवर टीका करत आहे मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार आहेत याविषयी स्पष्टीकरण देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सूचक वक्तव्य करत असे म्हटले आहे की, “तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे”.
न्यूज अनकट प्रतिनिधी