पुणे, 20 डिसेंबर 2021: केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा काल महाराष्ट्रातील दौऱ्याचा दुसरा दिवस होता. यादरम्यान काल ते पुण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाविकास आघाडीला “हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपाला हरवून दाखवावं” असं खुलं आव्हान दिलं.
हिंमत असेल तर राजीनामा देऊन मैदानात या
पुणे ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. मात्र, शिवसेना सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असं म्हणत आहे, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असं खुलं आव्हानच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं.
राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटोरिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर झालेले आहेत. ते चालत नाही. फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं, अशी टीका करतानाच महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा. हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? असा सवाल करा. देशाचं नेतृत्व या महाराष्ट्राने केलं. सर्व गोष्टीत महाराष्ट्र आघाडीवर होता. कृषीपासून ते सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर होता. हे लोक महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ शकते का? हे निकम्म सरकार आहे. या सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालाने झाली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे