शिरूर मधील इंदिरा गांधी पुतळ्याजवळील दारूचे दुकान त्वरित हटवा

4

शिरूर, दि. ५ जुलै २०२०: शिरूर मधील इंदिरा गांधी पुतळ्याजवळील दारूचे दुकान त्वरित हटवा यशस्वीनी वेल्फेअर फाउंडेशन व नारीशक्ती संस्थेची मागणी व शिरूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या इंदिरा गांधी पुतळ्याजवळील दारूचे दुकान त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी शिरूर तालुका यशस्वीनी वेल्फेअर फाउंडेशन व नारीशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन शिरूर तहसीलदार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती शिरूर तालुका महिला वेल्फेअर सचिव नम्रता गवारी यांनी दिली. यावेळी नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा शारदा भुजबळ, चंदना गायकवाड, ज्योती गजगे, वर्षा काळे, आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. शिरूर शहरातील इंदिरा गांधी पुतळ्याच्या शंभर मीटरच्या परिसरात दारूचे दुकाने असून खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यात गर्दी होतानाचे चित्र दररोज दिसत आहे. त्यातच तळीरामांचा हौदोस भररस्त्यात व इतरत्र सुरु असताना पाहावयास मिळतो. रस्त्याच्या कडेला दुकानांमधून दारू घ्यायची आणि त्याच्या समोर असलेला मोकळा परिसर तेथेच दारू पिण्यासाठी भर चौकात चढा- ओढ दिसत आहे.

सदर दारूच्या दुकानामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना व महिलांना या नाहक त्रासाला रोज सामोरे जावे लागत आहे. दारू पिऊन नशेत गाडी चालवणे, दारूच्या नशेत शिवीगाळ करणे, आपापसात भांडणे करणे, अशा यांच्या कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा व गावात वावरण्याचा धोका अधिक निर्माण झाला आहे.

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्याच स्मारकाच्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर ही बाब अतिशय खेदजनक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या स्मारकाची विटंबना होण्याची दाट शक्यता वाटत असून महिलांच्या दृष्टीने व स्मारकाच्या आदराने सदर परिसरात असलेली दारूची दुकाने तातडीने हटवावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा