अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय, मिळणार ३ पर्याय…

मुंबई, ४ सप्टेंबर २०२०: राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेचा तेढ अखेर सुटताना दिसत आहे. कालच याबाबत राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती. या चर्चेदरम्यान परीक्षेबाबत अंतिम स्वरुप निश्चित करण्यात आलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. यात ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेंट बेस परीक्षा असे तीन पर्याय देण्यात आले आहेत.

अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याबाबत या महत्त्वाच्या निर्णयात असे ठरवण्यात आले आहे की, प्रयोगशाळेत जाऊन प्रात्यक्षिक (प्रॅक्टीकल) करण्याऐवजी विद्यार्थ्यांची व्हायवा घेतली जाणार आहे. तसेच वरील तीन पर्याय देखील देण्यात आले आहे. विद्यापीठांना यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे.

काल राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत चर्चेदरम्यान ठरविण्यात आलेल्या स्वरूपाचा अहवाल आज सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. अकादमी कौन्सिलमध्ये जाऊन या अहवालाला परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर परीक्षा मंडळाकडे अहवाल मान्यतेसाठी पाठवावा लागेल. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना घरात बसून परीक्षा देता यावी, असा आमचा आग्रह होता. या आग्रहाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर उदय सामंत म्हणाले होते, “घरात बसून परीक्षा घेण्याच्या पद्धती तीन प्रकारच्या आहेत. यात ऑनलाईन, ऑफलाईन, एम सी क्यू अशा प्रकारांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत. तारखा निश्चित झाल्यावर जाहीर करु. पण विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असं गृहित धरायला हरकत नाही.”

३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळे निकाल जाहीर करु

उदय सामंत म्हणाले, “आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी (७/८ सप्टेंबरला) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन यूजीसीला परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विनंती करु. ३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळे निकाल जाहीर करु शकतो, अशी भूमिका कुलगुरुंनी घेतली आहे. त्याबाबत आम्ही यूजीसीकडे पाठपुरावा करु.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा