बारामती, २८ ऑगस्ट २०२०: सध्या असणाऱ्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व त्यामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदी मुळे राज्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रांवर दुरगामी परिणाम झाला आहे. त्याला शिक्षणक्षेत्र देखील अपवाद नाही. मागील पाच महिन्याच्या काळामधील शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भातील महाराष्ट्र स्तरावर निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता.कोरोना महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतू विद्यार्थ्यांकडून या सत्रांचे परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे. यासाठी अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
यंदाचे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करण्यात यावी. सरासरीच्या सूत्रामुळे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शैक्षणिक शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्क घेऊन प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे.स्वायत्त (खाजगी) विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठित करण्यात यावी.या प्रश्नांना घेऊन अभाविप महाराष्ट्रभर विविध विद्यापीठांचे कुलगुरू, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र भर मांडत आहे.
याच पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट २०२० रोजी अभाविप धुळे शाखेचे कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट पालकमंत्री यांनी टाळली. म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पालकमंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस प्रशासनाने अमानुषपणे लाठीमार केला.याच्या विरोधात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अन्यथा अभाविप संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.उदय सामंत राजीनामा द्या, उद्धव ठाकरे मुर्दाबद,ठाकरे सरकार मुर्दाबाद घोषणा देण्यात आल्या.
यावेळी अभाविप बारामती जिल्हा संयोजक समीर मारकड,अभाविप प्रदेश कार्यकारणी सदस्य वैभव सोलनकर,बाळासाहेब सोलनकर,किशोर आटोळे,स्वप्नील देवकाते, प्रसाद भोसले, ओंकार जगताप,शुभंकर बाचल,अक्षय नाळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: