छत्तीसगडमध्ये गावातील टाकीचे पाणी प्यायल्याने १३२ लोक आजारी, तात्पुरती छावणी उभारून उपचार सुरू

बालोद २२ जून २०२३: छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात एका गावात १३२ लोक अचानक आजारी पडल्याने खळबळ उडाली. जिल्ह्यातील गुंडेरदेही ब्लॉकमधील खुटेरी गावातील लोक आजारी पडले असुन त्यातील ११२ जण तापाने त्रस्त आहेत. एकाच गावातील १३२ हून अधिक रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाचे अधिकारी चक्रावून गेले.

या प्रकरणाची माहिती मिळताच आरोग्य विभागाकडून तात्पुरते शिबीर लावून ग्रामस्थांवर उपचार केले जात आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. उन्हाचा तडाखा आणि उष्माघातामुळे गावकरी आजारी पडत असल्याचे सांगण्यात येतय, पण नव्याने बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे पाणी पिऊन, सगळे आजारी पडल्याची चर्चा गावातील लोक करतायत.

आरोग्य विभागाचे सीएमएचओ जेएल उईके यांनी सांगितले की, खुटेरी गावात गेल्या दोन दिवसांत ताप, उलट्या-जुलाब आणि सर्दी खोकल्याचे १३२ रुग्ण आढळले. गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन, सर्व प्रभागातील रहिवाशांना पाणी उकळून पिणे, अन्नपदार्थ झाकून ठेवावे, शिळे अन्न खाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्यात क्लोरीनच्या गोळ्या वापरण्याचा सल्ला दिला आहे. सात दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत विशेष देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले असुन तात्पुरती शिबिरे लावून सर्वांवर उपचार केले जात असल्याचे उईके यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा