मुंबई, १४ फेब्रुवरी २०२३ : अलीकडेच जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वांत मोठा ऑटोमोबाईल उद्योग बनला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या पाच वर्षांत भारताला एक नंबरचा वाहन उद्योग बनविण्याचा रोडमॅप सादर केला आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की ऑटोमोबाईल उद्योगाचा एकूण आकार ७.५ लाख कोटी रुपये आहे. देशातील ऑटोमोबाईल उद्योगाची उलाढाल येत्या पाच वर्षांत १५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. भारताचा ऑटोमोबाईल उद्योग असा आहे, की तो देशात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करतो. आज जगातील सर्व ब्रँड्स भारतात आहेत. देशातील साडेचार कोटी लोकांना या उद्योगातून रोजगारही मिळतो.
एवढेच नाही तर देश आणि राज्यांना सर्वाधिक जीएसटी संकलनही वाहन क्षेत्रातून होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की पुढील पाच वर्षांत देशातील ऑटोमोबाईल उद्योगाची उलाढाल १५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचविण्याचे आमचे लक्ष्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानालाही हे साध्य करण्यात यश मिळत आहे. जगात सर्वांत जास्त तरुण प्रतिभावान अभियांत्रिकी मनुष्यबळ भारतात आहे. आपल्या देशातील सॉफ्टवेअर इंजिनिअरला जगभरात मागणी आहे. यामुळेच आज भारत प्रत्येक क्षेत्रात वेगाने पुढे येत आहे.
या क्षेत्राला गती देण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडत नाही. म्हणूनच आज इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो एलएनजी, सीएनजी, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन वाहने देशात दाखल होत आहेत. यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रत्येक पैलूचा अंतर्भाव करण्यात मदत होईल जे देशाला प्रथम क्रमांकाचे ऑटोमोबाईल क्षेत्र बनविण्यात प्रभावी ठरेल. यामुळे आगामी काळात भारत ऑटोमोबाईल क्षेत्रात मजबूत दावा करेल.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड