बारामती, दि. १९ जुन २०२०:बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे वन विभाग क्षेञातील वृक्ष तोड करुन ओंडके वाहून आणले जात आहेत.असे असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नसल्याने संबंधित अधिकारी त्यांच्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची बोलले जात आहे.
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रम राबवून वन विभागाने आपली पाठ थोपटून घेतली होती.वृक्षलागवडी संदर्भात शासनाकडून जाहिरातीवर आणि जनजागृतीवर हजारो रूपये खर्च केला जातो तसेच वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करत आहे माञ दुसरीकडे मोठ-मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.पाच-सात ते वीस-पंचवीस वर्षाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात सरासपणे वृक्ष तोड होत असून देखील दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.कडु लिंबांच्या झाडांच्या पालेदार फांद्या मोडून अथवा छाटणी करुन शेळ्यामेंढ्यांसाठी पालाव नेला जात आहेत आणि मोठे-मोठी जिवंत झाडे देखील बुडातून तोडून दिवसाढवळ्या ओंडके वाहुन नेत आहेत.
या ठिकाणी घनदाट झाडेझुडपे असल्यामुळे हरिण,लांडगे,ससा,घोरपड, तसेच इतर वन्यजीवांनी येथे आश्रय घेतला आहे.वारंवार होणा-या वृक्षतोडीमुळे या भागात पहिल्यासारखे पशुपक्षी या भागात दिसून येत नसल्याचे सांगण्यात आले.परंतु याठिकाणी वृक्षतोड करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने वृक्ष तोड करणाऱ्यांना अधिकाऱ्यांचा कोणताच धाक नसल्याने दिवसेंदिवस वृक्षतोड वाढत असल्याने हा परिसर ओसाड होऊ लागला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव.