गुजरातमध्ये पुन्हा मोदी-राहुल आमने-सामने, विधानसभेच्या ८ जागांवर पोटनिवडणूक

गुजरात, १४ ऑक्टोबर २०२०: बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका असूनही, गुजरातमधील ८ जागांवरील पोटनिवडणुकांबाबत भाजप आणि कॉंग्रेसने कंबर कसले आहेत. गुजरातमधील पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे निवडणुकीला चांगला तडका लागणार आहे. लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा गुजरातमध्ये आमने-सामने असतील. हे दोन्ही नेते ऑक्टोबरच्या अखेरीस गुजरात दौर्‍यावर येणार आहेत. विधानसभेच्या ८ जागांवर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणारी पोटनिवडणूक लक्षात घेता, दोन्ही नेत्यांचा दौरा खूप महत्वाचा मानला जात आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी गुजरात हे राज्य महत्वाचं आहे. त्यामुळे एका एका जागेसाठी चुरशीची लढत सुरू असते.

मोदी ३० ऑक्टोबरला अहमदाबाद येथे येणार:

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे येतील, दुसर्‍या दिवशी ३१ ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून गुजरातमध्ये साजरी केली जाईल. अहमदाबादमधील साबरमती नदीवरील सी प्लेनचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रीय एकता दिनी भव्य सोहळ्याच्या माध्यमातून केवडिया ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ गाठतील. ३ नोव्हेंबर रोजी गुजरातच्या ८ विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीमुळे पंतप्रधानांचा दौरा खूप महत्वाचा मानला जात आहे. जरी मोदी आपल्या प्रवासात कोणत्याही राजकीय रॅलीला संबोधित करणार नसले तरी, गुजरातमध्ये त्यांचे आगमन भाजपाला फायदेशीर ठरू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राहुल गांधींची ट्रॅक्टर यात्रा:

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधीही गुजरातमध्ये ट्रॅक्टर यात्रा घेऊ शकतात. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात राहुल गुजरात दौर्‍यावर येण्याची शक्यता आहे. ते पोटनिवडणुकीच्या वेळी राजकीय सभा आणि जनसंपर्कही घेऊ शकतात. ज्या आठ जागांवर निवडणुका होणार आहेत त्या आठ जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी २०१७ मध्ये मोहोर उमटवली होती. नंतर याच उमेदवारांनी काँग्रेसला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु बहुतेक आता तेच आमदार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने आपले नवीन तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आणले आहेत. जनता दल नक्कीच बंडखोर नेत्यांना धडा शिकवेल अशी पक्षाला आशा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा