नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये ३० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल प्रती लिटर तब्बल ६ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्यावरुन सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या मतभेदामुळे पेट्रोल स्वस्त होणार आहे. यासोबतच कोराना व्हायरसने जगभरात थैमान घातल्यामुळेदेखील त्याचा फटका कच्च्या तेलाच्या बाजारपेठेला बसत आहे.
सध्या कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या ओपेक या संघटनेची उत्पादन घटाबाबतच्या झालेल्या बैठकीत रशिया व सौदी अरेबिया यांच्यात एकमत न झाल्याने कच्च्या तेलाचे दर घसरले असल्याचे समोर साले आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत १४.२५ डॉलरने घट झाली. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत ३१.०२ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचली आहे. ही घट ३१.५ टक्क्यांची आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत १९ वर्षांअगोदर म्हणजे १७ जानेवारी १९९१ रोजी एवढी मोठी घट झाली होती.
सौदी अरेबिया आणि रशिया हे कच्च्या तेलाची निर्यात करणारे मोठे देश मानले जातात. मात्र, कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्यावरुन त्यांच्यात मतभेद आहेत.
भारत हा कच्च्या तेलांची आयात करणारा मोठा देश आहे. कच्च्या तेलांच्या किंमतीत घट झाल्याची स्पर्धा रंगल्यास त्याचा भारताला फायदा होणार आहे. त्यामुळे आता पेट्रोलच्या किमतीमध्ये किती रुपयांनी घसरण होणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.