नागपूर, २४ ऑक्टोबर २०२२: दिवाळीच्या दिवशी महाराष्ट्रातील नागपूर-भुसावळ मार्गावरील मालखेडनजीक कोळशाच्या मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले. तर दुसरीकडे कर्नाटक मध्ये देखील विजयवाडामधील जुम्नाल-मुलवाड मार्गावर मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. त्यामुळे दोन्ही राज्यांतील या विभागांतून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-भुसावळ मार्गावरील घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही स्वरुपाची जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर इतर गाड्यांचा मार्ग वळवण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यावर लगेचच विभागाचे कर्मचारी आणि तंत्रज्ञ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले.
कर्नाटकात देखील मालगाडीचे ७ डबे घसरले
तर, दुसरीकडे कर्नाटकमध्ये देखील रविवारी रात्री १२.४२ च्या सुमारास कर्नाटकातील जुम्नाल-मुलवाड रेल्वे विभागाच्या गदग-होटगी मार्गावर मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. त्यामुळे अनेक गाड्या रद्द तथा अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वेने सांगितले की, गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सध्या सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.