गोल पोस्ट महाराष्ट्र कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांच्या मोर्चावर लाठीमार, पोलिसांशी धक्काबुक्की

कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांच्या मोर्चावर लाठीमार, पोलिसांशी धक्काबुक्की

कोल्हापूर ७ जून २०२३: काल शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी मोबाईल वरती एक आक्षेपहार्य स्टेटस ठेवण्यात आले होते. यावरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर प्रचंड मोठा मोर्चा काढन्यात आला. जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. त्यामुळे आंदोलकांमध्ये एकच गोंधळ उडाला. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडून मोर्चेकरी सैरभैर पळाले.

आक्षेपार्ह स्टेटसवरून वाद निर्माण झाल्यानंतर आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्याचबरोबर मोर्चा काढणार असल्याचेही हिंदुत्ववाद्यांनी जाहीर केले. तर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आधीच जमाव बंदीचे आदेश लागू केले होते. मात्र, हे आदेश झुगारुन हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या. सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले. जमाबंदी आदेश आणि पोलिसांनी बंद मागे घेण्याचे केलेले आवाहन झुगारून हे आंदोलन करण्यात आले. मात्र, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोर्चाच्या ठिकाणी प्रचंड मोठा बंदोबस्त ठेवला होता. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील भागातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

सकाळी ११ वाजेपर्यंत हिंदुत्वादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच औरंगाबादेत औरंगजेबाचा फोटो फडकवणाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात आंदोलकांनी भगवे फेटे आणि भगवे शेले घातले होते. जमाव मोठ्या प्रमाणावर जमला होता. जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी त्यांना जुमानले नाही. उलट आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करताच आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. काही आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना लाठीचा मार दिला. त्यामुळे आंदोलकांची एकच धावपळ सुरू झाली. आंदोलक सैरभैर पळत असताना पोलीसही त्यांच्या मागे जाऊन त्यांना लाठीचा प्रसाद देत होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले नाही. परंतु कोल्हापुरात अजूनही तणावाची परिस्थिती आहे. मोर्चाच्या ठिकाणी आणि संवेदनशील परिसरात पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version