लासलगावात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त, लिलाव बंद पाडले

5

लासलगाव, नाशिक १५ जून २०२३ : तेलंगण राज्यात हैदराबाद येथे महाराष्ट्राच्या कांद्याला १८०० ते २००० रुपये बाजार भाव मिळत आहे. तर दुसरीकडे आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या विंचूरमध्ये कांद्याच्या लिलावात, प्रति क्विंटलला २०० ते ४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी एकातासाहून अधिक वेळ कांद्याचे लिलाव बंद पाडले.

विंचूर येथे गुरुवारी सकाळच्या सत्रात वीस ते तीस वाहनातील कांद्याचे लिलाव जाहीर करण्यात आले. या लिलावात बुधवारच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात, तीनशे ते चारशे रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडत, बाजार समितीच्या प्रशासनाला धारेवर धरले.

संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी, बाजार समितीचे संचालक संदीप दरेकर, छबु जाधव, राजेंद्र बोरगुडे, सहाय्यक सचिव प्रकाश कुमावत यांच्यासह लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी चर्चा केली. लिलाव झालेल्या कांद्याचे फेर लिलावात बाजार भाव न सुधारल्यास आपले आंदोलन सुरू ठेवा, मात्र फेर लिलाव एकदा होऊन द्या अशी भूमिका मांडण्यात आली. मध्यस्थी ने निघालेल्या तोडग्यावर, फेर लिलावामध्ये २०० रुपये विक्री झालेल्या कांद्याला ३०० रुपये तर ३०० ते ४०० रुपये विक्री झालेल्या कांद्याला ५०० ते ६०० रुपये इतका बाजार भाव मिळाला. कांद्याचे लिलाव सुरळीत झाल्याचे दिसताच संचालकांनी काढता पाय घेतला. त्यानंतर पुन्हा कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती जैसे थे झाली नी भाव घसरले.

आज कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च येत आहे. आज मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्च तर सोडाच, वाहतूक आणि मजुरीचा खर्च निघत नसल्याने तेलंगणा राज्य सरकार प्रमाणेच, राज्य किंवा केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा. विक्री झालेल्या कांद्याला एक हजार रुपये लाल कांद्याप्रमाणेच अनुदान द्यावे. नाफेड मार्फत कांद्याची दोन हजार रुपये हमीभावाने खरेदी करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा