मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ तीन नेत्यांना मिळू शकते संधी

पुणे, १७ जून २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत शुक्रवारी बैठक घेतली होती. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दोन दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. या मंत्रीमंडळ फेरबदलामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत. उत्तर प्रदेश निवडणूकीबरोबरच महाराष्ट्रामधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा मंत्रीमंडळामध्ये कोणाचा समावेश होऊ शकतो, यासंदर्भात काय शक्यता व्यक्त केल्या जात आहेत जाणून घेऊयात…
नारायण राणेंचं नाव आघाडीवर…
या चर्चांमध्ये सध्याचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं नाव आघाडीवर आहे. महत्त्वाचं म्हणजे सोमवारी नारायण राणे दिल्लीत गेले होते. नारायण राणे भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. राणे यांचं नाव चर्चेत असण्याचे कारण म्हणजे ते आघाडी सरकारचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यातही ठाकरे कुटुंबीयांचे सर्वात कट्टर विरोधक म्हणजे नारायण राणे.
अलीकडेच अमित शहा यांनी देखील नारायण राणे यांचं कौतुक केलं होतं. ७ फेब्रवारी रोजी खासदार नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ओरस पडवे येथे आले होते. या उद्घाटन प्रसंगी शाह यांनी दिलेल्या भाषणामध्ये राजकीय टोलेबाजी करण्याबरोबरच राणे यांचं कौतुकही केलं होतं. जिथे अन्याय होतो अशा वेळी नारायण राणे ठाम पणे भूमिका घेतात आणि आणि अन्यायाविरुद्ध स्पष्टपणे बोलणारा नेता असं वक्तव्य शहा यांनी केलं होतं.
प्रितम मुंडेंनाही संधी मिळण्याची शक्यता…
नारायण राणे यांच्यानंतर आणखीन एक नाव केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी चर्चेत आहे, ते म्हणजे बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे. राज्याच्या राजकारणामध्ये ओबीसींसंदर्भातील अनेक महत्वाचे मुद्दे प्रितम मुंडे आणि त्यांची मोठी बहीण तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे वेळोवेळी मांडत असतात. स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाअंतर्गत २७ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केल्याने महाविकास आघाडीवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रितम मुंडेंचा मंत्रीमंडळात समावेश करुन घेण्याचा विचार सुरु असल्याचे वृत्त आहे.
उदयनराजे भोसलेंच्या नावाचीही चर्चा…
ओबीसी आरक्षणा प्रमाणेच राज्यात मराठा आरक्षणावरून देखील मोठ्या प्रमाणावर राजकारण चालू आहे. यासाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं देखील चालू आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांचे नाव चर्चेत आहे. २०१९ साली उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यामध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उदयनाराजेंचा पराभव झाला होता. नंतर उदयनराजेंना भाजपाने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असतानाच उदयनराजे आणि नारायण राणे या दोन मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सहभागी करुन घेतले जाऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा