पुणे, 13 ऑक्टोंबर 2021: देशात सध्या कोळशाचे संकट कायम आहे. ज्या पॉवर हाऊसमध्ये आधी 17-17 दिवस कोळशाचा साठा असायचा त्यात आता फक्त 4-5 दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे. तर निम्म्याहून अधिक वीजनिर्मिती केंद्रांकडे फक्त एक किंवा दोन दिवसांचा साठा आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशातून येणाऱ्या कोळशाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे त्याचा पुरवठा कमी झाला आहे आणि देशांतर्गत कोळशावर अवलंबित्व वाढले आहे. परिणामी कोळशाचा तुटवडा जाणवत आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, आशियातील औष्णिक कोळशाचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत, ज्यामुळे चीन आणि भारतात कोळशाचे संकट निर्माण झाले आहे. चीननंतर भारत हा कोळशाचा दुसरा सर्वात मोठा वापरकर्ता देश आहे.
कोळशाच्या किमतीत झपाट्याने वाढ …
रॉयटर्सने नमूद केलं आहे की, 8 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या उच्च दर्जाच्या थर्मल कोळशाची किंमत 229 डॉलर प्रति टनावर पोहोचली आहे, या वर्षी 30 एप्रिल रोजी 88.52 डॉलर प्रति टन होती. त्याचप्रमाणे, जपान आणि दक्षिण कोरियाच्या कोळशाच्या किमतीतही गेल्या वर्षी सप्टेंबरच्या तुलनेत यावर्षी 400% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्याच वेळी, इंडोनेशियन कोळसा, जो 2020 मध्ये 22.65 डॉलर्स प्रति टन इतका उच्चांक गाठला होता, 8 ऑक्टोबर रोजी 439% वाढून $ 122.08 प्रति टन झाला.
किंमत वाढली असूनही ऑस्ट्रेलियन कोळसा इंडोनेशियन कोळशापेक्षा कमी चांगला आहे. त्याचा परिणाम असा झाला की चीनने ऑस्ट्रेलियाकडून कोळसा खरेदी करणे बंद केले आणि इंडोनेशियातून ते वाढवले. मात्र, तरीही ऑस्ट्रेलिया भारताला कोळसा पुरवत आहे.
भारत देखील कमी कोळसा खरेदी करत आहे!
कोळशाच्या वाढत्या किंमतीमुळे त्याची आयात प्रभावित झाली आहे. भारताने कोळशाच्या आयातीतही कपात केली आहे. रॉयटर्सने कमोडिटी सल्लागार केप्लरच्या हवाल्याने म्हटले आहे की भारताची आयात जूनपासून कमी होत आहे. भारताने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 2.67 दशलक्ष टन कोळसा आयात केला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 3.99 दशलक्ष टन होता.
चीनमध्ये कोळशाची वाढती आयात
एकीकडे भारतातील कोळशाची आयात कमी होत आहे, उलट चीनमधील आयात वाढत आहे. केप्लरच्या म्हणण्यानुसार, चीनने यावर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 3.27 दशलक्ष टन थर्मल कोळसा आयात केला आहे, गेल्या वर्षीच्या याच आठवड्याच्या तुलनेत 1.47 दशलक्ष टन वाढ झाली आहे. दुसऱ्या आठवड्यात चीनची आयात 4.50 दशलक्ष टनांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे.
परिस्थिती कधी सुधारेल?
पण आयात केलेला कोळसा भारत आणि चीन या दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, आयात केलेल्या कोळशाच्या किमती वाढल्याने दोन्ही देशांनी देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न वाढवले आहेत. चीनने सुरक्षेचे कारण सांगून बंद केलेल्या खाणी पुन्हा उघडण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर भारताची सरकारी कंपनी कोल इंडिया देखील उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात. परंतु जोपर्यंत देशांतर्गत उत्पादन प्रत्यक्षात वाढत नाही तोपर्यंत आयात केलेल्या कोळशाच्या किंमती खाली येण्याची अपेक्षा नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे