तिसर्‍या वनडेत हरता हरता वाचली टीम इंडिया, सिकंदर रझाने असा केला खेळ, वाचा थरार

6

IND vs ZIM 3rd ODI, २३ ऑगस्ट २०२२: टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा १३ धावांनी पराभव केला. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला २९० धावांचं लक्ष्य दिलं होतं पण त्यांना केवळ २७६ धावा करता आल्या. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा (११५ धावा) याने शानदार शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेचा ३-० असा निर्वाळा केला.

लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ एका क्षणी १६९ धावांत सात विकेट गमावून २०० धावाही करू शकणार नाही असे वाटत होते. पण सिकंदर रझा याचा हेतू वेगळा होता. रझाला इव्हान्समध्ये चांगला जोडीदार मिळाला आणि या जोडीने १०४ धावा जोडून सामना रोमांचक झाला.

असा होता शेवटच्या षटकांचा थरार

झिम्बाब्वेला शेवटच्या १३ चेंडूत १७ धावांची गरज होती आणि तीन विकेट शिल्लक होत्या. अशा स्थितीत ४८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आवेश खानने ब्रॅड इव्हान्सला (२८ धावा) एलबीडब्ल्यू आऊट करून भारताच्या आशा उंचावल्या. त्यानंतर ४९ व्या षटकात शार्दुल ठाकूरने चौथ्या चेंडूवर सिकंदर रझाकला आऊट करत झिम्बाब्वेचे स्वप्न मोडले. रझाने ९५ चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांसह ११५ धावा केल्या.

रझा बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेला विजय मिळवणे कठीण झाले आणि शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आवेश खानने न्युचीला बोल्ड करून भारताचा विजय निश्चित केला. भारताकडून आवेश खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर दीपक चहर, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा