राज्यात गेल्या दोन दिवसांत सुमारे ७०० रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि. ६ मे २०२०: राज्यात आत्ता पर्यंत १५,५२५ प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये गेल्या २४ तासात ८४१ नवीन प्रकरणे वाढली आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ६१७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात गेल्या २४ तासात ३४ जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे . कालच्या प्रकरणांपेक्षा आज महाराष्ट्रात नवीन रुग्ण सापडण्याचा आकडा वाढला आहे. काल हाच आकडा ७७१ एवढं होता.

असे असले तरी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी ३५० आणि मंगळवारी ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडणे सुरू झाले आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली ही एक सकारात्मक बाब आहे.

गेल्या दोन दिवसात राज्यात सर्वाधिक मुंबईत ४६० रुग्ण घरी गेले आहेत तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात २१३ रुग्णांना बरे करून घरी पाठविण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा