नगर जिल्ह्यात १८ हजार लिटर बोगस दूध

अहमदनगर : अहमदनगर येथील ‘व्हे पावडरी’ कंपनीचे दूध भेसळयुक्त असल्याने आणि विनापरवाना दूध संकलन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तिसगाव (ता. पाथर्डी) येथील पारसचे व्हीआरएस फूड्सचे दूध संकलन केंद्र अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी सील केले.सहायक आयुक्त किशोर गोरे (अन्न) यांनी ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथील हिरामन शिंदे याच्या दूध डेअरीवर व्हे पावडरीचे भेसळयुक्त दूध अन्न व औषध प्रशासनाला कारवाईत सापडले. हिरामन शिंदे यांचे हे दूध पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील पारस कंपनीचे व्हीएसआर फुडसचे दूध संकलन केंद्रावर जात असल्याचे लक्षात आले.
सहायक आयुक्त किशोर गोरे यांनी त्यानुसार पारस कंपनीच्या दूध केंद्रावर छापा टाकला. त्यांना तपासणीत दूध संकलन केंद्राला परवाना नसल्याचे आढळले. तसेच हिरामन शिंदे यांच्या डेअरीचे दूध पारस कंपनीच्या दूध संकलन केंद्रावर जमा होत असल्याचे लक्षात आले.
यानुसार तपासणी करून दूध केंद्रावरील सुमारे १८ हजार लिटर दूध नष्ट केले. परवाना नसल्याने दूध संकलन केंद्र सील करण्यात आले. या दूध संकलन केंद्राची संपूर्ण चौकशी होणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गोरे यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा