नव्या वर्षात ‘या’ नायिकांचे वेब सिरिजच्या माध्यामातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण!

8

मुंबई, २४ डिसेंबर २०२२: हिंदी चित्रपटसृष्टीमधील अनेक दिग्गज कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. कोरोनाच्या काळात अनेक चित्रपट ओटीपी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले. तर माधुरी दीक्षित, अजय देवगन, सुनील शेट्टी अशा दिग्गज कलाकारांनी ओटीटीवर पदार्पण केले आणि प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्यानंतर आता २०२३ या नवीन वर्षी देखील अनेक कलाकारांच्या वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या ‘डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या वेब सिरीजमधून ओटीपी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सुजय घोष दिग्दर्शित या सिरीजमध्ये करीना कपूर खान, विजय शर्मा आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही वेब सिरीज ‘नेटफ्लिक्सवर’ प्रदर्शित होणार आहे. ही वेब सिरीज ‘द डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर आधारित आहे.

तर दुसरीकडे ‘दहाड’ या वेब सिरीजमधून सोनाक्षी सिन्हाने देखील प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका सोनाक्षी साकारणार आहे. अंजली भट असे सोनाक्षीच्या पात्राचे नाव असून सोनाक्षी बरोबरच विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाह हे कलाकार दिसणार आहेत. अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या माध्यमातून ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे.

तर अभिनय क्षेत्रात स्वतःची छाप पाडू पाहणारी नवी कोरी अभिनेत्री सारा अली खान हिची ‘ए वतन मेरे वतन’ ही वेब सिरीज ओटीटीवर प्रदर्शित होणार असून, यामध्ये सारा अली खान उषा मेहताची भूमिका साकारत आहे. ही वेब सिरीज आहे १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आहे. करण जोहर निर्मित आणि कन्नन आय्यर दिग्दर्शित या वेब सिरीजमध्ये सारा अली खान अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या माध्यमातून ही वेब सिरीज पाहता येणार आहे. याचप्रमाणे उर्मिला मातोंडकर हिची ‘तिवारी’ आणि काजोलची ‘द गुड वाईफ’ ह्या वेब सिरीज देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा