पुढील २४ तासांत ‘बिपरजॉय’ उग्र रूप धारण करणार ; “या” राज्यांना अलर्ट

नवी दिल्ली, १० जून २०२३: पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ गेल्या ६ तासांत प्रतितास ९ किमी वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. आज १० जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ५.३० वाजता ते अरबी समुद्रातील उत्तरेला घोंघावत होते. हे चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमी, मुंबईच्या पश्चिम-नैॠत्येस ६३० किमी, पोरबंदरच्या दक्षिण-नैॠत्येस ६२० किमी आणि कराचीच्या दक्षिणेस ९३० किमी अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवसांत ते हळूहळू उत्तर-वायव्य दिशेकडे सरकेल. या चक्रीवादळाच्या प्रभावाने आज पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या पूर्वमध्य आणि लगतच्या भागांमध्ये प्रतिताशी १३५-१४५ किमी वेगाने वारे वाहत आहे. या वाऱ्याचा वेग वाढून तो प्रतिताशी १७५ किमी होण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी १५ जूनपर्यंत अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

ईशान्य बंगालच्या उपसागर आणि आग्नेय बांगलादेश-उत्तर म्यानमार किनारपट्टीच्या लगतच्या क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमधील वलसाड समुद्रकिनारी आज उंच लाटा उसळल्या. यामुळे १५ जूनपर्यंत समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच केरळमधील तिरुवनंतपुरम कोझिकोडसह अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील समुद्रकिनारी उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा