ऐन दिवाळीत कंत्राटी कामगार अंदोलनाच्या पवित्र्यात!

“दर माहच्या वेतनातून कपात केलेला हक्काचा बोनस देण्याची पुणे महानगरपालिका कामगार युनियनची मागणी”!

पुणे, २७ ऑक्टोबर २०२० : पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक स्वच्छता विभागात ३५०० कंत्राटी पद्धतीने सफाईचे कामे करणाऱ्या सेवकांना दरवर्षी कंत्राटी कामगारांना संबंधीत कंत्राटदाराने दिवाळीत बोनस अदा करण्यात यावा म्हणून महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून परिपत्रक काढले जाते. मोठ्या दिमाखाने परिपत्रक जाहीर केले जाते पण प्रत्यक्षात सदर परिपत्रकानुसार ठेकेदार प्रत्यक्षात कंत्राटी कामगारांना दर महिन्याच्या वेतनातून कपात केलेल्या रक्कमेपेक्षा अतिशय तुटपुंजी रक्कम कोठे ४०००/- तर कोठे १०००/- बोनस म्हणून दिला जातो.
अनेक क्षेत्रीय कार्यालयात १५०० ते ३५०० दरमाह बोनसची कपात करण्यात येते परंतु कामगारांना दिवाळीत काहीच रक्कम दिली जात नाही. नियमाप्रमाणे वेतनाच्या ८.३३% बोनस दिला पाहिजे पण तशा पद्धतीने संबंधीत ठेकेदार बोनस देत नाहीत. हे वास्तव कामगार युनियनच्या लक्षात आले आहे.

महानगरपालिकेच्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी संबंधीत ठेकेदार करत नाहीत यामुळे कंत्राटी कामगारांची सर्रास आर्थिक फसवणूक होऊन खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. आणि महानगरपालिकेने ही बोनसची रक्कम ठेकेदारांना दिलेली असते, त्यामुळे ही महानगरपालिकेची सुद्धा फसवणूक होत असल्याची माहिती कामगार युनियनने दिली.

विश्रामबाग वाडा बिबवेवाडी, हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाकडील ठेकेदार कोणत्याही प्रकारची कपात न करता बोनस देतात हे देखील पुणे महानगरपालिका युनियनच्या निदर्शनास आले आहे. पण काही बाकीचे क्षेत्रिय कार्यालयाकडील ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
उदा. धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात दरमहा बोनस द्यायचा म्हणून मनपा ने कामगारांकरता दिलेल्या पैशातून ३५०० रू कपात करण्यात येते, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय मध्ये दरमाह २००० कपात करण्यात येते.
यानुसार धनकवडी मध्ये दिवाळीला ४२००० व कोथरूड मध्ये २४००० बोनस दिला पाहिजे, पण प्रत्यक्षात २/३ हजार दिला जातो. धनकवडीत ३२० कामगार व कोथरूड मध्ये २१० कामगार कार्यरत आहेत, यातून स्पष्ट होते की ठेकेदार करोडो रुपयांची मनपा व कामगारांची फसवणूक करत आहेत.

कोविड १९ च्या महामारीच्या कालखंडात कंत्राटी कामगारांनी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्ये पार पाडली आहेत तर काही कामगार कोरोनाग्रस्त होऊन मृत्युमुखी पडले आहेत त्यांना देखील कोणताही प्रकारची आर्थिक मदत व वारसांना नोकरी दिली नाही. तसेच टेंडरच्या अटीशर्तीला अनुसरून त्यांना सुरक्षेचे कोणत्याच प्रकारचे सुरक्षा साधने,गणवेश,दवाखान्याच्या सुविधा, वेतन चिठ्ठ्या देखील दिल्या जात नाहीत. संबंधीत ठेकेदार कागदोपत्री सर्व साधने उपलब्ध करून दिली जात आहे असे दाखवतात पण प्रत्यक्षात कामगारांना दिले जात नाही असे प्रत्यक्ष दर्शनी युनियनच्या निदर्शनात आले आहे, असे मत यावेळी युनियन पदाधिकऱ्यांनी व्यक्त केले.

यानुसार प्रशासना बरोबर युनियनने अनेक वेळा लेखी स्वरूपात निवेदन व पत्रव्यवहार करून देखील प्रशासन कंत्राटी कामगारांच्या अनेकप्रश्नांच्या संदर्भात गांभीर्याने दखल घेत नाही त्यामुळे कंत्राटी कामगारांत असंतोष पसरला आहे. प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या बोनस सहीत सर्व प्रश्नांच्यासंदर्भात वेळीच दखल घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा. जर कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली नाही तर ऐन दिवाळीत मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येतील ,असा इशारा युनियनचे अध्यक्ष काॅ. उदय भट व जनरल सेक्रेटरी काॅ. मुक्ता मनोहर यांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा