पुणे, १५ अक्टोबर २०२२ :पुण्यामध्ये आठवडाभर पावसाने सलगउघडीप दिल्यानंतर सकाळपासून कडक उन पडले होते आणि वातावरणात उकाडा होता. शुक्रवारी १४ ऑक्टोबर, दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळल्याने पुण्याच्या उपनगरात होलेवस्ती, उंड्री, ता. हवेली येथील जनार्दन होले यांच्यासह काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने पादचारी आणि दुचाकीचालकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागला. संस्कृती स्कूलच्या शेजारील रस्त्यावर पाण्यामध्ये कार अडकली होती. यावेळी नागरिकांनी वाहने ढकलून पाण्याबाहेर काढली. त्याचबरोबर इतर वाहचालकांना सतर्क केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन चेंबर उघडल्याने पाणी वाहून जाण्यास मदत झाली. नागरिकांच्या घरातील पाण्याचा निचरा होण्यास मदत मिळाली.
दरम्यान रामटेकडी परिसरात शुक्रवार, १४ ऑक्टोबर, दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. अचानक आभाळामध्ये ढग दाटून आले आणि एक ते दीड तास जोरदार पाऊस बरसला. सर्व रस्ते जलमय झाले होते त्यामुळे दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर