उल्हासनगर, २८ ऑगस्ट २०२०: यंदा कोरोनाचे सावट सर्वत्र असल्यामुळे याचा परिणाम गणेशोत्सवावरही दिसून आला आहे. दरवर्षी राज्यभरात गणेशोत्सव अगदी जोरदार साजरा केला जातो, परंतु यावर्षी असे दिसून आले नाही. सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. परंतु गणेशोस्तव साजरा करणे, गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन योग्य त्या चाली रिती प्रमाणे करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदा ही बाप्पांचे आगमन जोरदार झाले. परंतु शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून तसेच गणेश भाविकांना विसर्जनाचा त्रास होऊ नये आणि विसर्जनही व्यवस्थित व्हावे याकरिता उल्हासनगर मध्ये एक नवीन संकल्पना राबवण्यात आली आहे. “बाप्पाचे विसर्जन आपल्याच दारी” ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कारभारी गोडसे यांनी सांगितले की, या संकल्पनेचा मूळ हेतू आपल्या विभागातील रहिवाश्यांना विसर्जनाचा त्रास होऊ नये आणि विसर्जन पारंपरिक पद्धतीने व्हावे असा होता.
तसेच त्यांनी दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “लोकांना कोरोना असल्यामुळे बाहेर पडायची भीती वाटत आहे त्यामुळेच आम्ही ही संकल्पना राबवत आहोत.” त्यांच्यामार्फत दीड दिवस, अडीच दिवस, पाच दिवस आणि आज सात दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. यात त्यांनी एक टेम्पोचा वापर केला आहे. तो टेम्पो आपल्या घरासमोर येणार आणि त्यात विसर्जनाकरिता एक रंगीत आणि आकर्षक अशी टाकी ठेवण्यात येईल. गर्दी होऊ न देता बाप्पांचे विसर्जन केले जावे नंतर बाप्पांचे विसर्जन हे पुन्हा एकदा नदीपात्रात केले जाईल असे त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे